ठाणे : अनधिकृत मशिदी, मजारी, दर्गे, पीर उभारून जागा बळकावण्याच्या प्रकाराविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ( मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा - भांजे डोंगरावरील 'लॅड जिहाद' उघडकीस आणला आहे. पर्यटकांचा राबता असलेल्या येऊरमधील या मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अतिक्रमणे वाढत आहेत. तेव्हा, अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अन्यथा, दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदना द्वारे दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद,मजार आणि दर्ग्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई केली होती. असाच एक 'लँड जिहाद' ठाण्यातील येऊर परिक्षेत्रात समोर आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर वनक्षेत्रातील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे. याठिकाणी दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी मनविसेकडे केल्या आहेत. एरव्ही, एअर फोर्स स्टेशनच्या १०० मीटर परिसरात झाडे लावण्यास देखील मनाई असताना बिनदिक्कतपणे अशाप्रकारे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.
वायुसेनेच्या या युनिटच्या परिसरात मामा-भांजे दर्ग्या लगत काही अनोळखी लोक स्थलांतरित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षिततेला देखील धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र, ढिम्म प्रशासनाने रमजान सण असल्याचे निमित्त सांगुन कारवाईत चालढकल सुरु केली. त्यामुळे, मनविसेने थेट वनविभागाकडे निवेदन देऊन या अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम त्वरीत हटवण्याची मागणी केली असुन अन्यथा या दर्ग्याशेजारीच शंकर मंदिर उभारण्यात येईल. असा गर्भित इशारा मनविसेने दिला आहे.
एअरफोर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा दर्गा धोकादायक
निसर्गरम्य येऊरचे जंगल म्हणजे ठाणे शहराचे वैभव आहे. मुंबई आणि ठाणे शहराच्या मधोमध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या दक्षिणेकडे उंच डोंगर माथ्यावर मामा-भांजे दर्गा आहे. या डोंगरावर समाधी घेतलेल्या हजरत सय्यद बहाउद्दीन आणि हजरत सय्यद बद्रुद्दीन या सुफी पंथांच्या मामा-भाच्यांचे दर्गे असल्याची वदंता आहे. मात्र ते केव्हा आणि कसे आले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने त्या परिसरात अनधिकृत बांधकामे करण्यात आली असुन त्यामुळे एअरफोर्सच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. माहीम, सांगली कुपवाड, मुंब्रा नंतर आता येऊरमधील बेकायदा दर्गा व मशिदींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.येऊर परिसरातील मामा-भांजे दर्ग्या शेजारी झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. भारतीय वायु सेनेच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत व तेथे राहणाऱ्या अनोळखी लोकांबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासनाला कळविले आहे.तेव्हा, प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे. अन्यथा, दर्ग्याशेजारी शंकराचे मंदीर उभारण्यात येईल.- संदीप पाचंगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.