उल्हासनगर : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही महापालिकेत ३ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या पदाधिकार्यांनी आयुक्त अजीज शेख यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन केले आहे.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ९० टक्के पदे रिक्त असून वर्ग-३ व ४ मधील ४० टक्के पदे रिक्त आहेत. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी एक अतिरिक्त आयुक्त, २ उपायुक्त, ६ सहायक आयुक्त पदासह शहर अभियंता, बांधकाम वपाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आदी महत्वाचे पदे प्रतिनियुक्तीवर भरण्याचा पाठपुरावा शासनाकडे केला. दरम्यान लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाली असून महापालिकेत ३ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना सेवामुक्त करण्याची मागणी राजकीय पक्षनेतेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी अँड स्वप्नील पाटील यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी आयुक्त अजीज शेख यांना भेटायला जायचे असल्याचे सुरक्षारक्षकानां सांगण्यात आले.
महापालिका आयुक्त कार्यालय बाहेरील सुरक्षा रक्षकांनी प्रहार जनशक्तीचे पाटीलसह अन्य जणांना रोखताच संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त दालना समोर ठिय्या आंदोलन केले. अखेर आयुक्त शेख यांनी त्यांना बोलावून शासनसोबत याबाबत बोलणे सुरू असल्याचे सांगितले. महापालिकेत ३ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या मध्ये उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियांका राजपूत यांच्यासह ४ ते ५ अधिकारी आहेत. त्यांची माहिती शासन दरबारी पाठवून ऐन निवडणुकी समोर वर्ग-१ व २ चे अधिकारी देण्याची मागणी केली. उपायुक्त अशोक नाईकवाडे व प्रियांका रजपूत यांच्या बदली जागी नवीन अधिकारी शासनाने न दिल्यास, महापालिकेत सावळागोंधळ उडण्याची शक्यता होत आहे.