ठाणे : मुक्तछंद एक मुक्त व्यासपीठ या संस्थेतर्फे "जीर्णोद्धार" हि एकांकिका अभिनय कट्टयावर सादर करण्यात आली. या एकांकिकेच्या कलाकारांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये या एकांकिकेने आपला ठसा उमटवला आहे.
कृष्णा नावाच्या एका गरीब मूर्तिकाराची हि कथा असून वडील,गाव,समाज व्यवस्था यांनी त्याला हिणवल्याने तो आपला आत्मविश्वास गमावतो.व्यसनी व कर्जबाजारी बाप,घरची गरीबी अशी त्याची संघर्षमय गाथा मांडण्यात आली. पुढे गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार होतो व मूर्ती घडविताना मंदिरासोबत किसनाच्या विचारांचा देखील जीर्णोद्धार होतो.मंदिरांचे जीर्णोद्धार होत राहतील पण माणसांच्या विचारांचा जीर्णोद्धार केव्हा होईल असा प्रश्न या एकांकिकेतून समाजाला विचारण्यात आला आहे. यात सागर शिंदे,वैष्णवी पोतदार,यशवंत गावडे,अक्षय ठोंबरे,वैभव उबाळे,पूर्वा सोनार,अनिकेत सावंत,निखिल चव्हाण या कलाकारांनी काम केले.सागर शिंदे याने संगीत,अक्षय दाभाडे याने प्रकाशयोजना,सिद्धार्थ ठाकूर याने नेपथ्य,करिष्मा वाघ हिने वेशभूषा,अभिषेक परबलकर याने रंगभूषा,ममता सकपाळ हिने ध्वनी संयोजक म्हणून काम पाहिले.तेजल उगले याने रंगमंच व्यवस्था पाहिली. तसेच यावेळी अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी "कात्रीत अडकलेला नवरा" हे विनोदी प्रहसन सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.याचे लिखान मनोहर तळेकर यांनी केले होते तर दिग्दर्शन संदीप लबडे याने केले होते.ओमकार मराठे याने संगीत,श्रेयस साळुंखे याने प्रकाशयोजना,महेश झिरपे,प्रथमेश मंडलिक,अभय पवार यांनी नेपथ्य केले होते. आपली कात्री हरवल्याने बायकोची उडालेली गडबड व ती कात्री शोधताना नवरा कशाप्रकारे तिच्या प्रश्नांत अडकून रडकुंडीस येतो हे या सादरीकरणातून मांडण्यात आले.यावेळी कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले व दिपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक पंढरीनाथ सापकर यांनी केले. अश्या पद्धतीच्या एकांकिका वारंवार सादर होऊन समाजला समाज व्यवस्थेचा आरसा दाखवण्याची खरंच गरज आहे. असे विषय लोकांपर्यंत पोहचावेत या भावनेतुनच अभिनय कट्टा सारख्या नाट्य चळवळीस सुरवात झाली आहे. ही नाट्य चळवळ आपण अशीच चालू ठेवून कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करूया अश्या भावना अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी यावेळी व्यक्त केल्या.