ठाणे : ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयेदेखील फुल्ल होऊ लागली आहेत. माजिवडा-मानपाडा पाठोपाठ कळव्यातही कोरोनाचे रोजच्या रोज १५० च्या आसपास नवे रुग्ण आढळत आहेत. परंतु, त्यांना उपचारासाठी थेट भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात पाठविले जात आहे. ग्लोबल रुग्णालयदेखील सध्या फुल्ल झाले आहे. त्यामुळे यापूर्वी खारेगावचे भूमिपुत्र मैदानात सुरू केलेले आणि सध्या बंद असलेले रुग्णालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील यांनी महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
कळवा प्रभाग समितीची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे, तर कळव्यात सध्या रोजच्या रोज १५० च्या आसपास कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळत आहेत. परंतु, महापालिकेचे एकमेव ग्लोबल कोविड सेंटरही फुल्ल झाले आहे, तर कळव्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. नव्याने आढळणाऱ्यां रुग्णांना आता पालिका थेट भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात पाठवीत आहे. ते अतिशय लांब असल्याने त्या ठिकाणी येथील रहिवासी जाण्यास तयार नाहीत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिका आणि एमएमआरडीएने खारेगाव येथील भूमिपुत्र मैदानात कोविड सेंटर सुरू केले होते. त्याचा येथील रुग्णांना चांगला फायदा झाला होता. परंतु, एमएमआरडीएने महापालिकेने पैसे मागितल्याने हे रुग्णालय बंद केले आहे. परंतु, आता खऱ्या अर्थाने येथील स्थानिकांना या रुग्णालयाची गरज असल्याने पालिकेने यावर योग्य तो तोडगा काढून ते पुन्हा सुरू करावे, असे त्यांनी म्हटले आहे.