सदानंद नाईक उल्हासनगर : गेल्या वर्षी कुर्ला कॅम्प समतानगर रस्त्यावरील खचलेल्या नाल्याचा पुलाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी न झाल्यास नाला तुंबून परिसर जलमय होणार असल्याची भीती स्वछता निरीक्षकानें व्यक्त केली. महापालिका बांधकाम विभाग, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, महापौर आदींना स्वच्छता निरीक्षकानें पत्र दिल्याने, महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.उल्हासनगर पूर्वेतील कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी रस्त्यावरील समतानगर येथे मुख्य रस्त्याचा पूल व सरंक्षण कठडा गेल्या पावसाळ्यात खचला. याप्रकाराने एकच खळबळ उडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नगरसेवकांनी लावून धरली. दरम्यान महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली. तसेच लवकरच पुलाची दुरुस्ती केली जाईल. असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दुसरा पावसाळा तोंडावर आल्यावरही पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. ऐन पावसाळ्यात नाल्यावरील पूल खचल्यास पावसाचे पाणी तुंबून रवींद्रनागर, समतानागर, साईनाथ कॉलनी, तानाजी नगर, वडारपाडा परिसर जलमय होण्याची भीती चक्क महापालिकेच्या स्थानिक स्वच्छता निरीक्षकाने व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.महापालिकेच्या आयुक्त पदी डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली तेंव्हा पासून, महापालिका कारभारात सावळागोंधळ उडाल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. गेल्या एका वर्षांपासून कुर्ला कॅम्प समतानगर मुख्य रस्त्यावरील खचलेल्या पुलाची दुरुस्ती न झाल्याने, आयुक्तांच्या कारभारावर टीकेची झोळ उठली. तोंडावर आलेल्या पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती न झाल्यास, नाल्याचे पाणी तुंबून परिसर जलमय होण्याची भीती महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक व्यक्त करीत आहे. तसे झाल्यास शेकडो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. महापालिका आयुक्तांनी भविष्यातील वित्त व जीवितहानी लक्षात घेऊन, पुलाची दुरुस्ती करा. अशी मागणी वेळोवेळी केल्याची माहिती काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. तसेच नगरसेविका मीना सोंडे, अंजली साळवे, कविता बागुल, नगरसेवक प्रमोद टाले, राजेश वानखडे आदींनीही यापूर्वीच पुलाच्या दुरुस्तीची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली.तानाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर येथील पूल खचल्याने, पावसाळ्यात पाणी तुंबून रवींद्रनगर, तानाजीनगर, वडारपाडा, साईनाथ कॉलनी आदी परिसर जलमय होण्याची भीती स्वच्छता निरीक्षकानें व्यक्त केली. याप्रकाराने पावसाळ्या पूर्वीच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
उल्हासनगर समतानगर नाल्याच्या पुलाची दुरुस्ती करा, अन्यथा परिसर होणार जलमय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 8:24 PM