लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पूर्वेतील श्री मलंगगड रोडवरील द्वारली गावच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. पाच वर्षांपासून माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हे या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावरील अपघात वाढले असून, अनेक जण जखमी होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
कल्याण-मलंगगड रस्त्यावरील द्वारली गावाच्या रस्त्यासाठी पाटील यांनी मनपाकडे सातत्याने पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांचे जीवही गेले आहेत. तरीही मनपा बघ्याची भूमिका घेत आहे. वारंवार सांगूनही काहीच होत नसल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा पाटील यांनी घेतला आहे. या रस्त्याचे काम आठवडाभरात सुरू न झाल्यास कल्याण-मलंगगड रस्ता जाम करण्याचा इशारा त्यांनी दिला.
सध्या ग्रामीण भागात लग्नसराई सुरू असल्याने या रस्त्याचा सर्वाधिक वापर होत आहे. तरीही प्रशासन अजून किती अपघातांची वाट पाहणार आहे, असा संतप्त सवाल करीत जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, कृती करा; अन्यथा त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.
-------------------