डोंबिवली - कल्याण शीळ रोड वरून पेंढारकर कॉलेज/उस्मा पेट्रोल पंपकडे जाणाऱ्या जंक्शन जवळील नाल्यावरील पूल तोडून तो नवीन बांधण्याचे काम PWD तर्फे सुरू आहे. दुरुस्तीच्या या कामामुळे रस्त्याचा व पुलाचा अर्धा भाग तोडल्यामुळे एकेरी मार्गावरील वाहतूक सुरू आहे. येथे वाहनांची दिवसभर वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच खड्ड्याभोवती धोकादायक इशारा देणारा फलक, लाल झेंडा न लावता फक्त दोरी बांधल्यामुळे एखादे वाहन त्यामध्ये पडण्याची भीती आहे.
काही दिवसांपूर्वी घरडा सर्कल खांबालपाडा रोडवर दुचाकी स्वाराचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. एमआयडीसी व कल्याण शीळ रोडवरील अनेक नाल्यावरील संरक्षक भिंत/कठडे तुटलेल्या स्थितीत आहेत. पाठपुरावा करुनही त्यांची डागडुजी करण्यात येत नाही. कारण त्याची दुरुस्ती एमआयडीसी की केडीएमसी करावी यावरून वाद चालू आहेत. PWD ने त्यांचा अखत्यारीतील घरडा सर्कल ते टाटा नाका व पेंढारकर कॉलेज ते कल्याण शीळ रोड जंक्शन हे रस्ते व त्यावरील छोटे पूल यांची देखभाल दुरुस्ती चांगली केली असून केडीएमसीने त्याबाबतीत त्यांचा सल्ला व काही प्रमाणात मदत मिळते का ते पाहावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.