अंबरनाथ : संघटित क्षेत्रातील कामगारांना दिवाळीत बोनस मिळतो, तसाच तो रिक्षाचालकांनाही मिळावा, यासाठी रिक्षाचालक संघटनेने पुढाकार घेऊन आपल्या कमाईतील रक्कम बाजूला ठेवून ती व्याजासह दिवाळीत बोनस म्हणून वाटली. त्यामुळे यंदा अंबरनाथमधील रिक्षाचालकांना २५ लाख रुपयांचे बोनसच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. सुखदेव आहिरे या रिक्षाचालकाला सर्वाधिक १ लाख रुपये ‘बोनस’ मिळाला.दिवाळीत नोकरदारवर्गाच्या हातात पैसा खुळखुळतो. मात्र, रिक्षाचालकांचे पोट हातावर असल्याने अशी रक्कम त्यांच्या हाती येत नाही. परिणामी, त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले यांना खरेदी, फटाके याकरिता पुरेसे पैसे मिळत नाहीत. रिक्षाचालकांच्या हाती पैसे शिल्लक राहावे, यासाठी ‘बोनस’ या संकल्पनेवर आधारित बचत योजना सुरू केली. या योजनेत अनेक रिक्षाचालक दररोज पैसे गुंतवत होते. बचत केलेली रक्कम ही दिवाळीत रिक्षाचालकांना वाटण्यात आली. ही योजना २००३ मध्ये सुरू करण्यात आली. त्या वेळी केवळ १८ रिक्षाचालक योजनेत सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी २७७ रिक्षाचालक योजनेत सहभागी झाले. संघटनेच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.
बदलापुरात रिक्षाचालकाला लाखाचा बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:13 AM