ठाणे : अनधिकृत बांधकामांबाबत ज्या सहाय्यक आयुक्तांवर ठपका ठेवला होता आणि ज्यांच्या कार्यकाळ संपुष्टात आला होता, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे गरजेचे असताना ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, अशा महिला सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अनुराधा बाबर आणि प्रणाली घोंगे यांचा समावेश असून, दोघींना शनिवारी शासनाने भिवंडी महापालिकेत धाडले आहे. यापैकी बाबर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, घोंगे यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायचा होता.
दोघीही प्रतिनियुक्तीवर शासनाकडून आल्या होत्या. बाबर यांच्याकडे सुरुवातीला माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचा कार्यभार दिला होता. त्यानंतर लोकमान्य - सावरकर प्रभाग समितीचा पदभार देण्यात आला होता, तर प्रणाली घोंगे यांच्याकडे सुरुवातीला नौपाडा, त्यानंतर कळवा तसेच वर्तकनगर आणि शेवटी वृक्ष प्राधिकरण अधिकारी म्हणून पदभार दिला होता. शनिवारी शासनाने दोन्हींची भिवंडी महापालिकेत बदली केली.
एकीकडे प्रणाली घोंगे यांचा कार्यकाळ संपला नसतानाही त्यांची शासनाकडून बदली केली असताना दुसरीकडे शासनाकडूनच आलेल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही अजूनही काही अधिकारी ठाणे महापालिकेचे सेवेत आहेत. बाबर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली केली आहे. घोंगे यांचा ठाणे महापालिकेत केवळ एक वर्ष सात महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, तर शासनाकडूनच आलेले सचिन बोरसे यांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्यात आली आहे.