ठाणे : वृत्तपत्रात छापून येणारे नाटकाचे परिक्षण हे परिक्षण नव्हे तर तो रिपोर्ट आहे. नाटक हा साहित्याचा प्रकार आहे हे लोक अजूनही मानायला तयार नाही तो कला प्रकारच मानला जातो. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा काव्य आणि संगीत ते पुढे घेऊन जाऊ शकतात असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि व्यास क्रिएशन्स आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सवात रविवारी डॉ. विजया टिळक लिखीत ‘मराठी नाट्यसंगीत : स्वरुप आणि समिक्षा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वा. अ. रेगे सभागृहात पार पडला.
या ग्रंथाचे कौतुक करीत प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजय जोशी म्हणाले, डॉ. टिळक यांचे साहित्यावरचे प्रेम आणि त्यांची नाटकांबाबत असलेली ओढ तसेच, त्यांना स्वरांचा कान देखील असल्यामुळे त्यांनी हा ग्रंथ रसिकतेतून साकारला आहे. मराठी नाटकांचे डाक्युमेंटेशन आपल्याकडे नाही, त्याबाबत उदासीनता प्रचंड आहे. आपल्याकडे दिग्गजांनी लिहीलेल्या आविष्काराबाबत योग्य संदर्भ सुची ग्रंथ नाही. नाटक आणि संगीत नाटक हा मराठी संस्कृतीचा ठेवा आहे आणि तो वेगळा आहे याबद्दल दुमत नाही. परिक्षण प्रकार हा नाटकात नाही तो वेगळा प्रकार आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ समिक्षक डॉ. अनंत देशमुख म्हणाले, नाटकातला संगीत हा भाग अतिशय विलक्षण आहे. नाटकात संगीत आले त्यात गायक नटांचे मोठे योगदान आहे. नाट्यसंगीताची वाटचाल, त्याचा आलेख, नकाशा, त्याचा विकास हा महत्त्वाचा आहे असे मत व्यक्त करीत अभ्यासक, समीक्षक हा दशभुजेसारखा असावा, तो स्वत: विविध दिशांनी वाढलेला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, हेमंत काणे आणि व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्रीरंग खटावकर यांनी केले. यावेळी साहित्य - सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अभिनय कट्टा, अत्रे कट्टा, ब्रह्मांड कट्टा, टॅग, अजेय संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखा यांचा सत्कार करण्यात आला.