वसई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांना मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणाविषयी प्रश्न विचारला म्हणून त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यामुळे त्यांचा खरा मुखवटा समोर आला असून सत्तार यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी सकल मराठा वसईतर्फे शुक्रवारी तहसीलदार उज्ज्वला भगत-बनसोड यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती सचिन कदम यांनी लोकमतला दिली.मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री अब्दुल सत्तार हा माणूस टोपी घालून वारकरी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षात तो तसा नाही हे त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना शिव्या देऊन दाखवून दिले आहे. आज केवळ वसई तहसीलदार यांना निवेदन दिले आहे, मात्र यानंतर थेट बोलणाऱ्यांचे तोंड फुटलेले असेल. मराठा समाज नेहमी छत्रपतींनी दिलेल्या मार्गावर, संस्कारावर चालत आलाय, तर कधीच कोणत्या जाती-धर्माच्या विरोधात मराठा समाज नव्हता, पण असल्या बहुरुप्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सक्षम आहे, हे त्यांनी समजून घ्यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा मंत्र्यांना वेळीच चाप लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या प्रसंगी विश्वास सावंत, गोपाळ परब, सचिन कदम, जितेंद्र वेंगुर्लेकर, कुमार धुरी, कल्पेश सकपाळ, राम मंडलिक, भास्कर रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा नोंदवा’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 1:15 AM