डोंबिवली - शहरात पंधरवडयापासून वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण झाले असून तक्रार करण्याची पद्धत क्लिष्ट असल्याने ती सोपी कशी करता येईल या ग्राहकांच्या मागणीची दखल महावितरणने घेतली आहे. त्यामुळे आता वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता 'मिस कॉल' व 'एसएमएस' करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय ‘नोपॉवर’टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल. त्यामुळे कल्याण परिमंडळातील जास्तीत-जास्त वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेण्याचे व डिजिटल माध्यमातून वीजबिल भरण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. मिसकॉल दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा संदेश पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर ‘एमआरईजी’टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व ९९३०३९९३०३ या क्रमांकावर संदेश पाठवावा. या एका संदेशाद्वारे तसेच महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल अॅप, तसेच १८००२३३३४३५, १८००१०२३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो.
स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचा-यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल अॅप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा अबाधित आहे.
स्थिर आकारातील सवलत केवळ उद्योजकांनाच
स्थिर आकारातील सवलत केवळ व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यामुळे गैरसमज न ठेवता घरगुती ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून करावा. घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरीही एकाच वेळी येणारा अतिभार टाळण्यासाठी कल्याण परिमंडळातील वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून आॅनलाईन वीजबिल भरून गैरसोय टाळावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे अग्रवाल यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू
कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला