- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि ही वार्ता हळूहळू संपूर्ण सोसायटीमध्ये पसरली. शेजारच्यांनी तर सर्व संबंध तोड़ून फिनेल, डेटॉल दरवाजात टाकून ठेवले. काहींनी तर आमच्याकडे दूधवाल्याला पाठवणेही बंद केले. कारण, महापालिकेच्या एका महिला अधिकाºयाने सोसायटीच्या रहिवाशांची मानसिकता निगेटिव्ह केली होती, अशी व्यथा जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या कोरोनाबाधित झालेल्या प्राध्यापकाने मांडली. कोरोनाग्रस्तांना मानसिक आधाराची गरज असते. परंतु, सोसायटीच्या रहिवाशांनी मात्र मला प्रचंड मानसिक त्रास दिला. तरीही, न डगमगता यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन इतर कोरोनाग्रस्तांना लढण्याचे बळ देण्याचे मी ठरविले आहे.अनलॉक सुरू झाल्यावर १०० दिवसांनी हे प्राध्यापक तोंडाला मास्क, हॅण्डग्लोव्हज, डोक्यावर टोपी ही पुरेशी काळजी घेत महाविद्यालयाची व इतर बँकेची कामे करण्यासाठी बाहेर पडले. मात्र, बाहेरून आल्यानंतर घसा, अंगदुखी, ताप सुरू झाला. नेहमीच्या डॉक्टरकडून चार दिवस औषधे घेतली. डॉ. यशवंत वैद्य यांचा सल्ला घेतल्यावर त्यांनी दोन दिवस वाट पाहू या, असे सांगितले. त्यानंतर, ताप शंभरच्यावर यायला लागल्याने कोरोना टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. ३० जून रोजी कोरोनाची तपासणी केली आणि २ जुलै रोजी सायंकाळी हा अहवाल माझ्या हातात येणार होता. परंतु, महापालिकेकडे हा रिपोर्ट गेल्यावर तेथील एका महिला अधिकाºयाने त्या सोसायटीमध्ये राहत असलेल्या तिच्या नातेवाइकांना फोनद्वारे ‘तुमच्या सोसायटीत राहणाºया ठाणा कॉलेजच्या प्राध्यापकाला कोरोना झाला आहे,’ असे कळविले आणि ही वार्ता रिपोर्ट हातात येण्याआधीच म्हणजे दुपारच्या सुमारास संपूर्ण सोसायटीमध्ये हा-हा म्हणता पसरल्याचा आरोप या प्राध्यापकाने केला. योगासने, व्यायाम, शाकाहारी जेवणामुळे वाटले बरे - ठामपाही रुग्णाचे नाव गुप्त ठेवते, मग हातात रिपोर्ट येण्याआधीच माझे नाव कसे बाहेर आले, असा प्रश्नही त्यांनी केला. रिपोर्ट आल्यावर महापालिकेकडून मला फोन आला, त्यावेळी मी त्यांना होम क्वारंटाइन होईन, असे सांगितले. मी घरात एका वेगळ्या खोलीत बंदिस्त होतो. पण, रिपोर्ट आल्यानंतर दुसºया दिवशीच आमच्या दारात कुणी तरी फिनेल, डेटॉल टाकून ठेवले होते. काहींनी तर सेक्रेटरीला, ‘यांना घरात राहायला परवानगी देऊ नका’ असेही सांगितले.- अशा मानसिक त्रासाने कोणतीही कोरोनाबाधित व्यक्ती कोलमडून जाईल, असेही ते म्हणाले. नंतर हळूहळू ताप कमी झाला. ओमकार, योगासने, व्यायाम आणि शाकाहारी जेवण यामुळे एकदम बरे वाटले. मात्र, अशा निराशादायक वातावरणात सोसायटीतील दोन परिवार पहाडासारखे उभे राहिले. सेक्रेटरीच्या पत्नीने पहिल्या दिवसापासूनच जेवणाचा डबा देते, असे सांगितले. हजारो विद्यार्थी, मित्र परिवार प्रत्येकाने मदतीचा हात दिला. ‘त्या’ महिला अधिकाºयाकडे कोरोनाचे रिपोर्ट जात नसल्याने तिचा यात काही संबंध नाही. कोरोनाबाधित रुग्णाचे नाव बाहेर येणार नाही, याची महापालिका पुरेपूर काळजी घेते.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका
रिपोर्टमुळे सोसायटीची मानसिकता झाली निगेटिव्ह; ठाण्यातील कोरोनाबाधित प्राध्यापकाची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 6:23 AM