कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारात काढण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. या बस भंगारात काढण्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक सुधीर बासरे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. लोकायुक्तांनी त्याची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. हा अहवाल मिळताच त्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे लोकायुक्तांनी बासरे यांना कळविले आहे.
केडीएमटीच्या ६९ बस भंगारात काढण्यास बासरे यांनी विरोध केला होता. हा विषय महासभेत आला असता तो मंजूर करण्यात आला होता. या बस केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून घेतल्या होत्या. मात्र, बस आठ वर्षे पूर्ण न होताच तसेच ठरावीक किलोमीटरचे संचलन झालेले नसतानाच त्या भंगारात काढल्या गेल्या. या प्रकरणी सरकारी निधीचा अपहार झाल्याची तक्रार बासरे यांनी केली होती. लोकायुक्तांनी त्याची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागविला आहे.
-------------------------