कल्याण : दुर्गाडी किल्ला परिसरात उल्हास खाडीवरील जुना लोखंडी पूल हलक्या वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण प्रादेशिक विभागाला नुकतेच दिले आहेत.१९१४ ला ब्रिटिश राजवटीतील रिचर्डसन क्रुडास कंपनीने उल्हास खाडीवरील लोखंडी पूल बांधला होता. तो धोकादायक झाल्याने ७ डिसेंबर २००९ ला वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र आजची यावरून दुचाकींची वाहतूक सुरू आहे. या पुलासंदर्भात आॅफिस आॅफ सुप्रिटेंडिंग इंजिनीयर कोकण भवन यांनी ५ आॅगस्ट १९९१ ला पुलाच्या दुरुस्तीचा अहवाल दिला होता. त्यामध्ये पुलाची तज्ज्ञ कंत्राटदारामार्फत दुरुस्ती केल्यास ११ टन वाहतुकीसाठी हा पूल सक्षम असल्याचे म्हटले होते. पण या पुलासाठी कोणतेही सेफ्टी आॅडिट न घेताच तो बंद करण्यात आल्याचे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि राज्य सचिव इरफान शेख यांचे म्हणणे आहे. या पुलाची दुरुस्ती करून तो पुन्हा उपयोगात आणला जाऊ शकतो. दहा वर्षे बंद असलेला गुजरातमधील नर्मदा नदीवरील भरूच व अंकलेश्वर शहराला जोडणारा गोल्डन ब्रीज दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्याचप्रमाणे दुर्गाडी परिसरातील लोखंडी पुलावरील रस्ते बांधणीतील अनियमित भराव स्क्रॅपर मशीनच्या सहाय्याने काढून त्याखालील प्लेट्सची दुरुस्ती केल्यास त्यावरील काही टन भार कमी होईल. त्यानंतर अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याची बांधणी करून हलक्या वाहनांसाठी तो सक्षम पर्याय ठरेल. गोविंदवाडी बायपासवरून येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, रिक्षा, चारचाकी तसेच रुग्णवाहिकांसाठी पर्यायी दुहेरी मार्ग उपलब्ध झाल्यास दुर्गाडी चौकातील नवीन पुलावरची वाहतूककोंडी कमी होईल. या पुलाच्या पाडकामासाठी काही कंत्राटदारांकडून एमएसआरडीसी विभागामार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार काहींनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार या पुलाच्या पाडकाचा खर्च सात कोटी दर्शविला आहे. पण हे न करता जर या पुलासाठी दोन ते तीन कोटी खर्च केल्यास हलक्या वाहनांसाठी हा पूल पर्याय म्हणून उपलब्ध होईल, असेही नमूद करण्यात आले होते. दरम्यान, मनसेने पाठविलेल्या पत्रावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण प्रादेशिक विभागाच्या सार्वजनिक बांधकामाला पत्र पाठवून अहवाल देण्यास सांगितले आहे.‘अहवाल त्वरित द्या’जुना लोखंडी पूल कमी खर्चात दुरुस्त होईल का? तसेच जुना लोखंडी पूल हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात येईल का? या अनुषंगाने आपला अहवाल सरकारला त्वरित सादर करण्यात यावा, असे कोकण विभागाला पाठवलेल्या पत्रातम्हटले आहे
लोखंडी पुलाच्या स्थितीबाबत मागवला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:11 PM