भिवंडी : कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या इसमाचा लसीकरण केंद्रातच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील भाग्यनगर येथे २ मार्च रोजी घडली होती. तेरा दिवस उलटूनही या इसमाच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसल्याने तपास यंत्रणेबरोबरच आरोग्य यंत्रणेवरदेखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सुखदेव किर्दत (वय ४५) हे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून ते ठाणे येथील मनोरमानगर येथील रहिवासी होते. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून ते काम करत होते. २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता भाग्यनगर येथील कोविड लसीकरण केंद्रात दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना उपचारांसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा शवविच्छेदन अहवाल व इतर बाबी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र आता १३ दिवस उलटूनही नेमके कारण अजूनही समजू शकले नसल्याने नागरिक अनेक तर्कवितर्क काढत आहेत. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येण्यासाठी किमान अडीच ते तीन महिने लागतील, अशी माहिती स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी दिली आहे. सदर इसमाच्या मृत्यूचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र त्यात मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने हा अहवाल पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्याची माहिती भिवंडी मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.आर. खरात यांनी दिली आहे.
.....................