ठाणे : महाराष्ट्र दिनी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटांतील सर्वांकरिता लसीकरण मोहीम राबविण्याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी ठाणे जिल्ह्याकरिता केवळ २० हजार लसी मिळाल्याने ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ दोन ठिकाणी प्रातिनिधिक लसीकरण सुरू होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्र सलग चौथ्या दिवशी बंद होते. अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला असून परिणामी युवकांचा हिरमोड झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच, लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील महिन्यात ठाणे महापालिका प्रशासनाने वीकेण्ड टाळेबंदीचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मागील आठवडाभर जिल्ह्याला लस कमीअधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे मागील आठवड्यात ठाणे शहरासह जिल्ह्याच्या इतर भागांत लसीकरण बंद होते. अपुऱ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यामुळे जिल्ह्यात लसीकरण राबवायचे कसे, असा प्रश्न आरोग्य प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. त्यात, शनिवार १ मे पासून १८ ते ४४ वयोगटांतील सर्वांचे लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. मात्र, या मोहिमेसाठी आवश्यक व पुरेसा लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने प्रातिनिधिक स्वरूपात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे लस मिळणार या उत्साहात असलेल्या तरुणाईचा हिरमोड झाला.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्यासाठी मिळालेल्या २० हजार लसींपैकी भिवंडी महापालिकेला दोन हजार लसी देण्यात आल्या असून ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर या पाच महापालिकांसाठी प्रत्येकी तीन हजारप्रमाणे लसींचे वाटप करण्यात आले. लसींची उपलब्धता अशीच जेमतेम होत राहिली, तर १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण करायचे कसे, असा सवाल आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे.
प्राप्त लसींचा साठा
महापालिका कोविशिल्ड
ठाणे - ३०००
कल्याण-डोंबिवली - ३०००
मीरा-भाईंदर - ३०००
नवी मुंबई - ३०००
ठाणे ग्रामीण - ३०००
उल्हासनगर - ३०००
भिवंडी - २०००
..........
वाचली