लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपाने पणाला लावलेली प्रतिष्ठा आणि काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची खुमखुमी यामुळे चर्चेत असलेल्या भिवंडी महापालिकेसाठी बुधवारी मतदान होत आहे. काहीही करून सत्तेच्या जवळ जाता यावे, यासाठी भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे, तर समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. तरीही बहुरंगी होत असलेल्या या लढतींसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेले दोन दिवस उन्हाचा कडाका वाढलेला असल्याने दुपारच्या वेळी मतदानाला फटका बसण्याची शक्यता आहे.भिवंडीच्या २३ प्रभागातील ९० जागांसाठी ४५८ उमेदवार रिंगणात आहेत. एकाही पक्षाने सर्व जागा लढविलेल्या नाहीत. प्रचारात सुरूवातीला असलेला निरूत्साह वगळता शेवटच्या चार दिवसांत नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांनी धडाकेबाज प्रचार करत निवडणुकीत रंगत आणली. आमची सत्ता आली तर भिवंडीच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. भिवंडीत मेट्रो आणण्याचे आणि यंत्रमाग कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन भाजपा देत होती, पण या शिवसेनेने आपल्या वचननाम्यात त्याचा समावेश केला.
प्रतिष्ठा की स्वबळाची खुमखुमी?
By admin | Published: May 24, 2017 1:17 AM