कल्याण : केडीएमसीच्या गुरुवारच्या महासभेत ४२० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्थगिती दिल्यानंतर आयुक्त ई. रवींद्रन यांनी कोणतेही नवीन काम मंजुरीसाठी सादर करू नये, अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव असतील तर त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, असे परिपत्रक काढले आहे. दुसरीकडे आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या फाइल्स पुन्हा संबंधित विभागाकडे पाठवल्याने विकासकामांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही विविध प्रभागांतून विकासकामांच्या मंजुरीसाठी पाठवलेल्या २५० फाइल्स शुक्रवारी आयुक्तांनी त्यात्या विभागांत परत पाठवून दिल्या. महसुली खर्चाचे प्रस्ताव यापुढे अंदाजपत्रकातील तरतुदीच्या मर्यादेत अत्यावश्यक असतील तरच सादर करावेत. पालिकेच्या निधीतून केली जाणारी भांडवली खर्चाची कामे अतिशय गरजेची असतील तर त्यासाठी आयुक्तांची पूर्वमंजूरी घ्यावी, असे परिपत्रक काढले आहे. सरकारकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत हे परिपत्रक लागू राहील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
अत्यावश्यक त्याच कामांना परवानगी
By admin | Published: October 01, 2016 3:05 AM