मीरारोड - एजंटच्या मार्फत दुबईत हॉटेल मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून गेलेल्या भाईंदरच्या २९ वर्षीय तरुणीचे शोषण करून पगार दिला जात नव्हता . या प्रकरणी पोलिसांच्या भाईंदर भरोसा सेलने परराष्ट्र मंत्रालय व दुबईतील हॉटेल मालका सोबत चर्चा करून तिला परत भारतात सुखरूप आणले आहे .
भाईंदर पश्चिम भागात राहणाऱ्या एका महिलेने ३ जून रोजी भाईंदरच्या भरोसा सेल येथे तक्रार अर्ज केला होता . तिची २९ वर्षीय मुलीला दिल्लीतील तरुण ( वय वर्षे ४० ) ह्या एजंटने दुबई येथील एका नामांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट चे काम असुन महिना ७० हजार रूपये पगार असल्याचे सांगितले होते. ८ एप्रिल रोजी ती दुबई येथे पोहचल्यावर एजंट तरूण याने तिचा पासपोर्ट व व्हिजा काढून घेतला. तिला ४० ते ५० महिला राहत असलेल्या एका हॉलमध्ये ठेवले. अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात होते . जबरदस्तीने अधिक तास काम करवून घेतले जात होते . त्यातच तिला अस्थमा असल्याने तिची तब्बेत खराब होत चालली. तिने एजंट तरूण यास सांगितले असता, ६ महिने काम करावेच लागेल असे सांगितले.
हॉटेल मालक सलीम ह्याने पगार हा एजंटला दिला सांगितले . एजंटने तिचा दोन महिन्याचा पगार स्वतःच घेतला . पोलिसांच्या भाईंदर येथील भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांच्या कडे तक्रार आल्यावर शिंदे यांच्या सह भारती देशमुख, आफ्रिन जुन्नैदी, पूजा हांडे, अक्षय हासे, विजय घाडगे यांच्या पथकाने तरुणीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले . शिंदे यांना ह्या आधी देखील परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरखरूप आणण्याचा अनुभव होता .
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तेजश्री शिंदे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर "मदद" या पोर्टलवर तरुणीची माहिती दिली . तरुणीशी संपर्क करून तिची हकीकत जाऊन घेत तिला धीर दिला . हॉटेल मालकाचा क्रमांक घेऊन शिंदे यांनी त्याच्याशी संपर्क साधला . तिची तब्येत बरी नसून उपचाराची आवश्यकता असल्याने तात्काळ भारतात परत पाठवण्याबाबत चर्चा केली . अखेर मालक सलीम ह्याने तरुणीला परत पाठवण्याची तयारी दर्शवली आणि ती ६ जून रोजी मायदेशी सुखरूप परतली .
परदेशात कामाचे चांगले पैसे मिळतील या आमिषाने भारतातून कामानिमित्त अनेक मुलींना परदेशात एजंटच्या मार्फतीने पाठवले जाते. परंतु परदेशातील कायदे व प्रक्रिया माहित नसल्याने अनेक कामगार परदेशामध्ये अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांनी अशा एजंटपासून सावधान रहा व कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे .