कल्याण : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रविवारी बिर्ला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात भारत आणि परदेशातील ४८ क्रीडाप्रेमींसह क्रीडा संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.
बिर्ला महाविद्यालय सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे करीत आहे. हे वर्ष महाविद्यालयाचे संस्थापक वसंतकुमार बिर्ला यांच्या जन्मशताब्दीचेही आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी नवी दिल्ली सहसचिव डॉ. बलजित सिंग सेखोन हे प्रमुख अतिथी होते. कैवल्यधाम योग केंद्राचे सीईओ सुबोध तिवारी हे प्रमुख वक्ता होते. महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी खेळांना अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग बनविला पाहिजे याकडे लक्ष वेधले. या चर्चासत्रात मलेशिया, इंडोनेशिया, जाफना, बांगलादेश, फिलिपीन्स, व्हिएतनाम, गुजरात, हैदराबाद, मेरठ या भागातील मान्यवर सहभागी झाले होते. या चर्चासत्रासाठी आयोजक डॉ. हरीष दुबे, यज्ञेश्वर बागराव, दत्ता क्षीरसागर, किरण रायकर, अनिल तिवारी, भरत बागुल, दिनेश वानुले, मधू शुक्रे आदी प्राध्यापकांनी विशेष भूमिका पार पाडली.