ठाणे : कोरोनाने पालक दगावलेल्या बालकांच्या सध्याच्या जीवन जगण्यासह त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शासनाने विविध सवलती व योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून मिळणारे अकराशे रुपये, नोकरीतील एक टक्का आरक्षण, शैक्षणिक सोयीसुविधा, कायदेशीर पालकत्व, राज्य व केंद्र शासनाकडून मिळणारा निधी, वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी कायदेशीर वारस आदींसाठी जिल्ह्यात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल सक्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत केलेली कार्यवाही व पाठपुरावा खालील प्रमाणे आहे.
१) शोधून काढलेली बालके - १०३४,
२) आई व वडील दगावलेली बालके - ३९,
३) एक पालक दगावलेली बालके - ९९५,
४) ९९५ बालकांपैकी ३८३ बालकांना दरमहा अकराशे रुपये लाभ देण्यात आलेला असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.
५) दोन्ही पालक दगावलेल्यांच्या अनाथ प्रमाणपत्रासाठी ४९ बालकांपैकी २९ बालकांचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाला सुपुर्द.
६) मालमत्ता संबंधीच्या अडचणी निकाली काढण्यासाठी १८ वर्षांच्या आतील ३९ बालकांची माहिती न्यायाधीशांना सुपुर्द.
७) पाच लाखांचा लाभ मिळवून देण्यासाठी ३९ बालकांची माहिती संकलित.
८) शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी दोन्ही पालक मयत असलेली दहा बालके व एक पालक मयत असलेली ८५ बालके पात्र आहेत.
९) बाल कल्याण समितीकडून ३९ बालकांच्या पालकत्वासाठी कायदेशीर आदेश प्रक्रिया सुरू.
१०) केंद्र शासनाच्या पीएम केंद्राद्वारे मिळणाऱ्या १० लाख रुपयांसाठी २३ बालकांचे प्रस्ताव संकेतस्थळावर दाखल. उर्वरित बालकांची नोंदणी सुरू.