स्टार १०६९
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध शिथिल झाल्याने तसेच २२ ऑगस्टला साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे पुढील काही दिवसांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. सध्या श्रावणामुळे विविध सण, व्रत-वैकल्य सुरू आहेत. त्यानंतर लगेच पुढील महिन्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपासून पुढील महिनाभर आरक्षण तिकीट फुल असल्याचे दिसून येत आहे.
कोविडकाळात पर्यटन व्यवसायही पूर्णतः बंद होता. हॉटेल, पर्यटन व धार्मिक स्थळे बंद असल्याने नागरिकही कुठेही जात नव्हते. आता परिस्थिती बदलत असून, नजीकच्या काळात त्या व्यवसायाला पुन्हा गती मिळेल असे दिसून येत आहे. प्रवासी रेल्वेने राज्यात, राज्याबाहेर जाण्यासाठी तयार झाले असून, हळूहळू रेल्वे प्रवास वेटिंगवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची चिन्ह आहेत.
-------------------------
येथे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण वेटिंगवर
- चेन्नई, हैदराबाद, दिल्ली त्याचबरोबर राज्यातील कोकण, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या फुल्ल आहेत.
- उत्तरेला, दक्षिणेला तसेच कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या या २४ पेक्षा अधिक डब्यांच्या असून, त्या सध्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यात ३ टायर एसी, २ टायर एसी याचे मिळून पाच डबे, स्लीपरचे १७ ते १८ व अन्य जनरल डबे, असे सर्वसाधारण वर्गीकरण असते.
-------------
या गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रतीक्षा
एलटीटी-हैदराबाद स्पेशल- स्लीपर ५२ वेटिंग
सीएसटीएम-बिदर एक्स्प्रेस- स्लीपर ६६ वेटिंग
सीएसटीएम-सोलापूर स्पेशल- स्लीपर वेटिंग ४७
सीएसटीएम-गदग एक्स्प्रेस - स्लीपर ४८ वेटिंग
------- ---------
कोरोना चाचणीची अट-शिथिल
आता राज्यांतर्गत प्रवास करताना कोविडची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करावी लागत नाही. बहुतांशी ठिकाणी अन्य राज्यांनी ती अट-शिथिल केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास पुन्हा पूर्ववत सुरू झाला आहे. बहुतांशी मार्गावरील गाड्यांची आरक्षण फुल्ल झाल्यावरून नागरिक प्रवासाला निघाल्याचे चित्र स्पष्ट आहे.
-----------------