उल्हासनगर: वडिलांच्या निधनानंतर आईसह भावाच्या कुटुंबाची आधारस्तंभ बनलेली रेश्मा हिचा गेल्या आठवड्यात अपघात झाला. मात्र मंगळवारी दुपारी तीची मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज संपली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन परिसरात रेश्मा गुरबानी आईसह मोठया भावा सोबत राहत होती. वडिलांचा मृत्यू झाल्यावर घर संसाराचे ओझे स्वतः घेतले होते. गेल्या आठवड्यात भावाच्या मुलाच्या वाढदिवसा निमित्त कपडे घेण्यासाठी गेलेल्या रेश्माला रात्रीच्या अंधारात अनोळखी वाहनाने जबर धडक दिली.
या अपघातात रेश्मा हिच्या डोक्याला मार लागला. सुरवातीला शहरातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी मुंबई रुग्णालयात हलविण्याचा सल्ला कुटुंबाला दिला. गुरबानी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने, त्यांच्या मदतीला समाजसेवक शिवाजी रगडे व त्यांचे मित्र धावले. स्थानिक रुग्णालयाचे बिल त्यांनी माफ करून देऊन, रेश्माला मुंबईला हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी येणाऱ्या खर्चासाठी त्यांनी मदतीचे आवाहन केल्यावर, रेश्मा गुरबानी हिच्या आईच्या बँक खात्यावर हजारो रुपये जमा झाले. त्या पैशातून रेश्मा हिच्यावर उपचार सुर होते. मात्र मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात दुःख व्यक्त होत आहे. वृद्ध आई व भावाचे कुटुंब उघडे पडले आहे.