लोकमत न्यूज नेटवर्क अनगाव : सरकारचा गौणखनिजाचा महसूलकर बुडवून रेतीमाफियांना मदत करणारे भिवंडीचे निवासी नायब तहसीलदार संदीप आवारी यांची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांना दिले आहेत.‘गौणखनिज वसुलीमध्ये सावळा गोंधळ’ या शीर्षकाखाली शुक्र वारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत निवासी नायब तहसीलदारांची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी नोटीस बजावली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. थिटे यांनी जप्त केलेले रेतीचे ट्रक सोडण्यासाठी कुठलाही लेखी आदेश दिलेला नसतानाही संबंधितांनी ते सोडले होते. यासंबंधी आदिवासी महादेव कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनीष भोईर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्र ार केली. त्यासंबंधी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. जर रेतीमाफियांनी ते विनापरवानगी नेले असतील, तर तहसीलदारांनी १२ दिवसांनंतरही चोरीचा गुन्हा दाखल का केला नाही. तहसील विभाग रेतीमाफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्र ारदारांनी केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
निवासी नायब तहसीलदारांची चौकशी
By admin | Published: July 03, 2017 6:17 AM