ठाणे: कौटुंबिक कलहातून घरातून निघून गेलेल्या प्रवीण सावंत (४२) यांचा अवघ्या १२ तासामध्ये पुण्यातून शोध घेण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले. त्यांना गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील एका शाळेत शिपाई म्हणून नोकरीस असलेले प्रवीण हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. यासंदर्भात त्याचदिवशी त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांचा मोबाईल फोनही बंद होता. नंतर त्यांनी नागपूरला असल्याचे सांगून आपल्याला पैशांची गरज असल्याचा फोन पत्नीस केला. त्यांनी केलेल्या फोन क्रमांकाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस नाईक सुनील राठोड आणि अंमलदार किशोर काळे आदींच्या पथकाने तातडीने या मोबाईलचे लोकेशन मिळविले. ते पुण्याच्या शिवाजीनगर भागात मिळाले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी त्यांच्या पत्नीला गुगल पे द्वारे पैसे पाठविण्यासाठी पुन्हा कॉल केला असता, हा क्रमांकही पोलिसांना मिळाला नाही. त्यावर कुटुंबीयांच्या मदतीने स्थानिक हॉटेलचा क्रमांक त्यांच्याकडून पोलिसांनी मिळविला. तेंव्हा या हॉटेलमालकास नौपाडा पोलिसांनी वस्तुस्थिती सांगून त्यांना थांबवून ठेवण्यासही सांगितले. तोपर्यंत पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. तोपर्यंत तिथे पोहचलेल्या नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले आणि सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. कौटुंबिक कलहामुळे आपण घर सोडल्याची प्रवीण यांनी पोलिसांना कबुली दिली. मात्र, ते सुखरुप घरी परतल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
कौटुंबिक वादातून ठाण्याहून बेपत्ता झालेला रहिवासी सापडला पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 9:52 PM