बदलापूर - दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे प्रशिक्षणार्थींनी केलेल्या आंदोलनाचा फटका इतर स्थानकांप्रमाणे बदलापूरमधील प्रवाशांनाही बसला. ऐन गर्दीच्या वेळी पेटलेल्या या आंदोलनामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.सकाळच्यावेळी डाऊन दिशेला येणाऱ्या लोकल येत असल्या तरी अप मार्ग आंदोलनामुळे पूर्णपणे बंद झाला होता.अप मार्गावरील एकही लोकल येत नसल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी झाली होती. काही काळाने कुर्ल्यापर्यंतची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र लोकल अनिश्चित वेळेने धावत होत्या. त्यामुळे कामावर निघालेले अनेक प्रवासी कल्याणपर्यंत प्रवास करून माघारी परतत होते. तब्बल साडेतीन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र बदलापूर, कर्जत आणि खोपोली कडून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक पूर्वपदावर आली नव्हती.
मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली होती. तब्बल साडेतीन तासांनंतर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले व सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला.
अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.