फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने बाणेगर गल्लीतील रहिवाशांनी मानले पालिकेचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:57 PM2021-07-02T17:57:51+5:302021-07-02T18:01:25+5:30
Miraroad News : बाणेगर गल्लीतील फेरीवाले आणि त्यांच्यामागचे माफियामुळे स्थानिक रहिवासी त्रासले होते. त्यांची दहशत व गुंडगिरी मुळे लोक भयभीत होते.
मीरारोड - मीरारोडच्या नया नगरमधील बाणेगर गल्लीतील फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त व उपायुक्त यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार मानले. विशेष म्हणजे मनसे आणि काँग्रेसने मात्र फेरीवाल्याची बाजू घेत कारवाई वर टीकेची झोड उठवली होती. रहिवाशांनी मात्र कारवाईचे समर्थन करत या दोन्ही पक्षांच्या विरोधाची हवा काढून टाकली आहे.
बाणेगर गल्लीतील फेरीवाले आणि त्यांच्यामागचे माफियामुळे स्थानिक रहिवासी त्रासले होते. त्यांची दहशत व गुंडगिरी मुळे लोक भयभीत होते. तक्रारदाराचे नाव कळताच त्यांच्या घरी माफिया पोहचत होते. कोरोना नियमांचे सुद्धा सर्रास उल्लंघन केले जात होते. त्यांनी थेट शासनापर्यंत तक्रारी चालवल्या होत्या.
पालिकेने येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून बेकायदेशीर हातगाड्या तोडून टाकल्या. त्यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल होऊन मनसे व काँग्रेसने फेरीवाल्याचा कळवळा व्यक्त करत पालिकेच्या करवाईवर टीका केली. मनसे नेत्यांनी तर फेरीवल्याला हातगाडी भेट दिली. परंतु मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या तक्रारी केल्याचे समोर आले.
एका पदाधिकाऱ्याने तर फेरीवाले पालिकेचे जावई आहेत का? असा सवाल केला होता. त्यावरून नालासोपारा येथून येणाऱ्या त्या अमराठी फेरीवल्यास नवीन हातगाडी दिल्याने फेरीवाला मनसेचा जावई आहे का? असा सवाल लोक करू लागले आहेत. दरम्यान शुक्रवारी बाणेगर गल्लीतील रहिवाशांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त अजित मुठे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर कारवाई केल्याबद्दल पुष्पगुच्छ देत आभार मानले.
बाणेगर गल्लीतील रहिवाशांच्या तसेच विविध राजकिय पक्षांच्या या अनाधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध वारंवार तक्रारी महापालिकेस प्राप्त होत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग समितीने येथील अनाधिकृत हातगाडयांवर कारवाई कारवाया करुन अनाधिकृत फेरीवाले हटविले असे उपायुक्त मुठे म्हणाले. बाणेगर गल्लीतील या अनाधिकृत फेरीवाल्यां विरूद्ध महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे आमची सुटका झाली. आम्ही या फेरीवाल्यांच्या दहशतीखाली असतो अशा शब्दांत रहिवाशांनी आपल्या होणारा त्रास व्यक्त केला.