मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ५ मधील दोन इमारतीच्या रहिवाशांनी राजकीय पक्ष व राजकारण्यांना इमारतीच्या आवारात येण्यास बंदी घातली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असताना राजकारण्यांनी केवळ पोकळ आश्वासनेच दिल्याने लोक संतप्त झाले आहेत.
शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेशबंदी जारी केली आहे. तसे फलक इमारतींच्या दर्शनी भागांमध्ये लावण्यात आले आहेत. इमारतीच्या आवारात व तळमजल्यावरील घरांमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचते. गेल्या तीन-चार वर्षांपासून तर पाणी साचण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे.
पावसाळ्यात तळमजल्यावर असलेल्या घरांमध्ये तीन फुटाच्या आसपास पाणी साचते. त्यातच शौचालयातील मैला व सांडपाणी हे उलट दिशेने येऊन घरांमध्ये पसरते. साचलेले पाणी तासनतास कमी होत नाही. काहीजण तर घरातच लहान मोटर लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. घरात साचणाऱ्या पाण्यामुळे फर्निचर, अंथरूण, कपडे, फ्रीज व धान्य आदी साहित्य खराब होऊन मोठे नुकसान होत आहे. लोकांचे हाल होत आहेत. तळमजल्यावरील घर खरेदी करायला कोणी येत नाही. काही रहिवासी मिळेल ती किंमत घेऊन घर विकून गेले.
शांतीनगर सेक्टर ५ मधील या दोन इमारतींसमोर शीतलनगर आहे. या दोन्ही वसाहतींदरम्यान सार्वजनिक रस्ता आहे. या ठिकाणी असलेल्या नाल्याची उंची कमी करून रस्त्याच्या समांतर घेतल्याने पाणी वेगाने आमच्या घरात शिरते, असा भूमिका व गोदावरी इमारतीतील राहिवाशांचा दावा आहे. नगरसेवकांपासून महापौर, आमदार, आयुक्त आदींकडे गाऱ्हाणी मांडून झाली आहेत. पण उपयोग झाला नाही.
वास्तविक शीतल नगर व शांतीनगर या जुन्या वसाहती आता सखल झाल्या आहेत. महापालिकेने रस्ते व गटारे यांचा इमारतींच्या उंचीशी समतोल न ठेवता ते उंच केले आहेत. नाले अरुंद असून, त्याची साफसफाई काटेकोरपणे केली जात नाही. पुढे या नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक तेवढ्या रुंदी आणि खोलीचे नालेच बांधण्यात आलेले नाहीत.
गणेश पै (स्थानिक रहिवासी) - गेल्या पंचवीस वर्षांपासून पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रकाराने आम्ही त्रासलो आहोत. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून शीतलनगर येथील नाल्याची उंची कमी केल्याने आमच्याकडे पाणी वाहून येऊन पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रहिवाशांना नुकसान व हाल सहन करावे लागत आहेत. नेत्यांवर रहिवाशांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच राजकारणी व निवडणुकीतील उमेदवार आदींना प्रवेश मनाई केली आहे.