मीरारोड - मीरारोडच्या एका निवासी इमारतीतल्या सदनिकेत डान्सबार चालत असल्याचा आरोप करणाऱ्या राहिवाश्यानीच धाडस करून १० बारबाला पकडून दिल्या. पोलिस, पालिका, उत्पादन शुल्क आदींचा वरदहस्त असल्याने सदनिकां मध्ये बेकायदा बदल करून ह्या बार मध्ये धिंगाणा चालत असल्याचा आरोप राहिवाश्यांनी केलाय.
सिल्व्हर पार्क नाक्यावर असलेल्या चंद्रेश ऍकॉर्ड निवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तीन सदनिकां मध्ये बेकायदेशीर फेरबदल व जिना काढण्यात आला आहे. तेथे मॅडोना उर्फ खुशी ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यात आला. सदर बार मधून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने लाऊडस्पीकरचा आवाज येत असल्याने रहिवाशांनी ११२ वर कॉल करत तक्रार दिली.
तक्रारीची कुणकुण लागताच बार मधील बारबाला ह्या बार मधून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत जाऊन लपल्या. राहिवाश्यांनी त्या सदनिकेस बाहेरून कडी घालून पोलिसांना पाचारण केले. मध्यरात्रीच्या सुमारास
मीरारोड पोलिस आल्यावर त्या बारबालांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी ३३ डब्ल्यू नुसार गुन्हा दाखल केला असता ही नाममात्र कारवाई असल्याचा संताप रहिवाश्यांनी बोलून दाखवला.
येथील नागरिक हे सदर बार मुळे त्रस्त असून महापालिका, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. तरी देखील कारवाई तर सोडाच पण ऑर्केस्ट्रा बारला नवीन नावाने परवानगी दिली जाते.
निवासी सदनिकां मध्ये नियमबाह्यपणे चालवल्या जाणाऱ्या ह्या ऑर्केस्ट्रा कम डान्सबार मधील अंतर्गत बेकायदा बांधकामे हटवून बेकायदा फेरबदल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. बार मधून चालणाऱ्या अनैतिक अश्लील प्रकारांना तसेच ध्वनिप्रदूषण ला आळा घालवा , सर्व परवाने रद्द करून बार चालक - मालकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राहिवाश्यांनी केली आहे.