लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल तसेच मानपाडा येथील दोस्ती इम्पारिया इमारतींमध्ये अनेक गैरसोयी असल्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या समस्या सोडविण्यासाठी येथील रहिवाशांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनाच निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी म्हटले आहे की, वर्तकनगरच्या दोस्ती रेंटल आणि मानपाडा येथील दोस्ती इम्पारिया येथील इमारतींना सुरक्षारक्षकच नसतो. लिफ्ट बंद पडल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्यांसाठी अग्निशमन दल किंवा पोलिसांना पाचारण करावे लागते. त्यांच्या मदतीनेच अडकलेल्यांना बाहेर काढले जाते. या लिफ्टची एकमेव चावी बिल्डरच्या ताब्यात असते.गेल्या तीन वर्षांत पाण्याच्या टाकीची स्वच्छताच न झाल्यामुळे रहिवाशांना गढूळ पाणी प्यावे लागते. या दोन्ही ठिकाणी कचरा काढण्यासाठी ठामपाकडून उपायोजना न झाल्याने याठिकाणी कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात. फायर सेफ्टी रुममध्येही काहींनी संसार थाटले आहे. ड्रेनेज लाइन फुटल्यामुळे सांडपाण्यासह मलमूत्र रस्त्यावर येते. त्यामुळेच मानपाडा पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे. वर्तकनगर येथे जनरेटरची सुविधा आहे; परंतु, मानपाडा येथे वीज खंडित झाल्यानंतर १८ व्या मजल्यावर जाण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध नाही. याशिवाय, दोन ते तीन वर्षे फायर सेफ्टी आॅडिट झाले नाही. अग्निप्रतिबंधक विभागाची सर्व सामुग्रीही चोरीस गेलेली आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याठिकाणी मोठी हानी होऊ शकते. या दोन्ही ठिकाणी आरोग्य विभागाकडून फायलेरिया किंवा मलेरिया प्रतिबंधक औषध फवारणीही झालेली नाही.
‘दोस्ती’चे रहिवासी समस्यांच्या गर्तेत
By admin | Published: July 08, 2017 5:37 AM