ठाणे - मोबाइल टॉवरचे घातक परिणाम होत असतांना कोपरी मधील अष्टविनायक चौकाच्या पुढील भागात भर वस्तीत मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट घातला जात होता. परंतु स्थानिक नागरीकांना या मोबाइल टॉवरचे काम गुरुवारी रस्त्यावर उतरुन बंद केले आहे. या बाबत महापालिकाा अथवा स्थानिक नगरसेवकालासुध्दा सुगावा नसल्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे. कोपरीतील अष्टविनायक चौक परिसरात गार्डन जवळील प्राण्यांची प्रतिकृती असलेल्या ठिकाणी मागील काही दिवसापासून हे काम सुरु होते. सुरवातीला लाईटचा टॉवर उभारला जात असल्याचे रहिवाशांना सांगण्यात आले होते. परंतु गुरवार मात्र हा लाईटचा टॉवर नसून मोबाइलचा टॉवर असल्याची बाब नागरीकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरुन या विरोधात आंदोलन केले. तसेच हे खड्डा खोदण्याचे काम बंद पाडले आहे. तर येथील अर्धा खड्डा सुध्दा रहिवाशांनी पुन्हा भरला आहे. या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक नगरसेवकांना या ठिकाणी पाचरण करण्यात आले असता, त्यांनासुध्दा याची कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका आता या मोबाइल टॉवर कंपनीच्या विरोधात काय अॅक्शन घेणार असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
भर वस्तीत मोबाइल टॉवर उभा करणे म्हणजे येथील नागरीकांच्या जिवीताशीच एक प्रकारे हा खेळ होता. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन हे काम बंद पाडले आहे.(सचिन बांद्रे - स्थानिक नागरीक)