ठाणे : ठाण्यातील बहुप्रतिक्षित क्लस्टर योजनेने मंगळवारी महत्त्वाचा टप्पा गाठला. येथील यूआरसी १ आणि यूआरसी २ च्या मास्टर ले आऊटला ठाणे पालिकेच्या उच्चाधिकार समितीने मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून येथील रस्ता रुंदीकरण आणि इमारतींच्या बांधकामांस सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे किसननगर येथील बेकायदा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळणार आहे.
ठाण्यातील धोकादायक बेकायदा बांधकामांमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात किसननगर येथील बेकायदा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांना मालकी हक्काचे घर मिळणार आहे. सिडको या योजनेची अंमलबजावणी करणार असून तसा करार ठाणे महापालिकेने त्यांच्यासोबत केला आहे.
क्लस्टर योजनेअंतर्गत वर्तकनगर येथे यापूर्वीच संक्रमण शिबिराच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. आता किसननगर मास्टर ले आउटला मंजुरी मिळाल्यामुळे वागळे इस्टेट रस्ता क्र. २२ च्या ४० मीटर रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे. तसेच, यूआरसी १ आणि यूआरसी २ मधील मोकळ्या भूखंडांवर कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या इमारतींच्या बांधकामाला सिडकोला सुरुवात करता येणार आहे.
मास्टर लेआऊटला मंजुरी मिळाल्यामुळे प्रदीर्घ संघर्षानंतर २० वर्षांचं स्वप्न अखेरीस पूर्ण होण्याच्या दिशेने सुरुवात होत आहे. क्लस्टरमधील संक्रमण शिबिराच्या इमारतीच्या बांधकामाला यापूर्वीच वर्तकनगर येथे सुरुवात झाली आहे. आता उच्चाधिकार समितीने मास्टर ले आऊटला मंजुरी दिल्यामुळे येथील मोकळ्या भूखंडांवर कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या इमारतींच्या बांधकामांचा मार्गही मोकळा झाला आहे. - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री व पालकमंत्री, ठाणे जिल्हा.
क्लस्टर योजनेतील महत्त्वाचा टप्पा-
यूआरसी १ आणि यूआरसी २ च्या मास्टर ले आउटला उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. यामध्ये या दोन यूआरसीमध्ये नेमक्या काय सुविधा असतील, याचा संपूर्ण आराखडा आहे. या मंजुरीनंतर आता या क्लस्टरअंतर्गत इमारतींच्या बांधकामांना परवानगी मिळण्याचा तसेच अन्य सुविधा विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे मनपा.