उल्हासनगर : गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही इमारत सील करून रहिवाशांना बाहेर काढले. सहायक आयुक्त गणेश शिंपी हे पथकासह बुधवारी ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी गेले असता, रहिवाशांनी कारवाईला विरोध केला.
उल्हासनगर महापालिकेने १४७ पेक्षा अधिक इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या असून इमारतींना नोटिसा देऊन नागरिकांना इमारती रिकाम्या करण्यास सांगितले आहे. गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील १९९२ ते ९८ दरम्यान बांधलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतींची यादी जाहीर केली. तेथे राहणाऱ्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले आहे. साईशक्तीच्या शेजारील इमारती व नागरिकांना धोका होऊ नये म्हणून इमारत जमीनदोस्त करण्यासाठी शिंपी पथकासह गेले होते. कारवाईची माहिती रहिवाशांना मिळताच ते इमारतीभोवती जमले. त्यांनी कारवाईला विरोध करून काही अवधी मागितला आहे.
धोकादायक झालेली ही इमारत जमीनदोस्त करण्याची गरज असल्याचे शिंपी यांनी सांगितले. तर दुसरीकडे इमारतीमधील बेघर झालेल्या नागरिकांनी स्वतः इमारत पाडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे महापालिकेने त्यांना १५ दिवसांचा अवधी देऊन त्यांच्याकडून लेखी घेतल्याची माहिती शिंपी यांनी दिली.