ठाणे: हिंमत असेल तर राजीनामा द्या, तुमच्याविरुद्ध ठाण्यातून निवडणूक लढतो, असे खुले आव्हानच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी दिले. ठाण्यातील घाेडबंदर भागात त्यांनी शिवसेना शाखांना भेटी दिल्या. त्यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अमावस्या आणि पोर्णिमेलाच मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी शेती करायला जातात. ते चंद्राच्या प्रकाशात कशाची शेती करतात? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यांच्या गावी जायला रस्ताही नाही. पण दोन दोन हेलिकॉप्टर्स त्यांच्या शेतात उतरतात. असे हे राज्यातील गरिब शेतकरी असल्याचा मिश्कील टाेलाही त्यांनी लगावला.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले राज्यात एकही रोजगार नाही. नवा उद्योग नाही. लहान लहान दुकानांवर नाहक कारवाई केली जाते. पण केंद्र सरकारकडून जीएसटीचा पैसा आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. राज्यात असे हे अवकाळी सरकार डोक्यावर बसविले आहे.
उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. नगरविकास खात्यासाठी शिंदे मातोश्रीवर रडल्याचीही त्यांनी आठवण करुन दिली. शिंदेना मंत्रालयात मोकळा हात दिला. मात्र, ईडी आणि आयटीमधून वाचण्यासाठीच उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रीया झाल्या त्याच काळात त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा पुनरुच्चारही आदित्य यांनी यावेळी केला. पहिल्या तिकीटापासून ते मंत्री होण्यापर्यंत सर्व काही दिले. तरी पक्ष चोरल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाण्यात आणि राज्यात गुंड आणि कॉन्ट्रॅक्टर यांचेच पोस्टर दिसतात, असंही ते म्हणाले. या सरकाने हिंमत दाखवली असती तर ठाण्यासह इतर महापालिकांची निवडणूक घेतली असती.
भाजपने २०२२ मध्ये शिवसेना फोडली. २०२३ मध्ये राष्ट्रवादी आणि आता २०२४ मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले. देश आणि महाराष्ट्र हिताचे आपले हिंदुत्व असून संविधानाच्या संरक्षणासाठी ठाणेकरांनी साथ देण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी केले. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढू, असे आव्हानही त्यांनी यावेळी शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातून दिले.
यावेळी घाेडबंदर रोड, मनोरमानगर भागातील शाखांना त्यांनी भेटी दिल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील जिजामातानगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या नविन शाखेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. चंदनवाडी शाखेला भेट देऊन खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक नरेश मणेरा, संतोष शिर्के, प्रदीप पूर्णेकर, अमोल हिंगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा करुन ठाण्यात शिवसैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरुवातीला कोपरीतील आनंदनगर चेकनाका भागात आदित्य यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.