लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे समाजककल्याण, महिला व बाल विकास समिती आणि बांधकाम व आरोग्य विभाग आदी तीन सभापतींनी आपले राजीनामे देऊन दुसऱ्या सदस्यांचा मार्ग मोकळा करून दिला. या तिन्ही सभापतींसाठी १९ जुलैरोजी निवडणूक घेण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत.
जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप या सर्व पक्षांची सत्ता आहे. शिवसेनेच्या पुष्पा बोर्हाडे-पाटील यांची काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. आता या तीन सभापतींची निवड हाती घेतली आहे. राष्ट्रवादीचे संजय निमसे यांनी मात्र राजीनामा दिलेला नाही. ते कृषी सभापती म्हणून कारभार पाहात आहेत. त्यामुळे उर्वरित भाजपच्या महिला व बाल विकास समितीसह शिवसेनेच्या हिश्श्याच्या समाज कल्याण सभापती व बांधकाम व आरोग्य या विषय समितींसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली आहे.
या विषय समित्यांच्या कारभाराची एखादी फाईल समजून घेईपर्यंत सभापतींचे राजीनामे घेण्याचा सपाटा येथील सत्ताधारी शिवसेनेने याआधीही घेतलेल्या राजीनाम्यांवरून उघड झाले आहे. १९ जुलैरोजी नियोजन समिती सभागृहात ही निवडणूक घेतली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुकांची शिवसेना व भाजपच्या वरिष्ठांकडे सदस्यांनी धावपळ सुरू केली आहे. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा कृपाशीर्वाद मिळालेल्यांना या सभापतींच्या निवडणुकीची संधी मिळणार आहे.