ठाणे : मागील महिन्यात सहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदाचा सुषमा लोणे यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी अंबरनाथच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांची निवड झाली. त्यापाठोपाठ आता, बांधकाम व आरोग्य समिती सभापती आणि महिला बाल कल्याण समिती सभापतींचा कार्यकाल संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापतीपदी रत्नप्रभा तारमाळे तर, समाज कल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या नंदा उघडा, तसेच बांधकाम समिती सभापतीपदी कुंदन पाटील व कृषी समिती सभापती संजय निमसे विराजमान आहेत. मात्र, कार्यकाल संपुष्टात आल्याने कुंदन पाटील व रत्नप्रभा तारमाळे यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या दोन रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.