ठाणे : वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बड्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबरच मनसेच्या नेत्यांसह अनेक स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी या नेत्यांनी केली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकरणावरून यंत्रणेवरच टीका करून ठाकरे सरकारवरच निशाणा साधला. तर या प्रकरणात दोषी असलेल्या रुग्णालयाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली. सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकारची चौकशीचे आदेश देतानाच महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक रुग्णालयांचा ऑक्सिजनबाबत आढावा घेतला जात असल्याचे सांगितले.
चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई
या संपूर्ण प्रकरणाची भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची चौकशी समिती नेमली असून, चौकशीनंतर या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ऑक्सिजनअभावी हा प्रकार झाला असता तर अनेक रुग्णांचे प्राण गेले असते. मात्र, चौकशी नंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या रुग्णालयात ३५ आणि १२ असे दोन आयसीयू येथे आहेत. त्यातील ३५ मधील चार जणांचे मृत्यू झालेले आहेत; परंतु या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तर बिलाच्या बाबतीतही चौकशी करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठाण्याला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
....
दोन दिवसांत कारवाई करा :
ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी कोणाकडे होती? ऑक्सिजन साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा ऑक्सिजन साठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? या विविध मुद्द्यांबाबत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून दोषींवर दोन दिवसांत कारवाई करावी.
-निरंजन डावखरे, आमदार भाजप
ऑक्सिजन ही अत्यावश्यक बाब आहे, त्याचे नियोजन करणे गरजेचे होते. हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीमुळे चार जणांचे मृत्यू झालेले आहेत. एकीकडे ऑक्सिजन असल्याचे सांगितले जात आहे; परंतु तो पुरवठा होत आहे का? हे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी.
-संदीप पांचगे, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष, ठाणे
ही माणुसकीला काळिमी फासणारी घटना आहे. वारंवार येथे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालय प्रशासनावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
-महेश कदम, मनसे नेते