बदलापूर - बदलापूरमधील एस.डी.एम. इंग्रजी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला देण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याने शाळेतील वातावरण तंग झाले होते. सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळेवर संतापले होते. शाळा प्रशासन गुणपत्रिकेच्या मोबदल्यात पैशांची मागणी करत असल्याने हा प्रकार घडला होता. अखेर, पालकांच्या संतापानंतर प्रशासनाने गुणपत्रिका देण्याचे मान्य केले.दहावीचा निकाल लागून दोन आठवडे उलटूनही शाळा गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, याच शाळेत अकरावी करत प्रवेश घ्या, अशी सक्ती मुख्याध्यापक करत असून त्याकरिता गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याचाच जाब विचारत पालक आणि विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरले. सोमवारी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. मात्र, असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना नगसेवक शैलेश वडनेरे यांनी दिला आहे.आधीच प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ सुरू असताना त्यात शाळेने अशा प्रकारे अडवणूक केल्यामुळे विद्याथी, पालकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थी धास्तावून गेले होते. प्रवेशाच्यावेळी आवश्यक कागपत्रांमध्ये या दोन गोष्टी लागत असल्याने शाळा या कागदपत्रांची अडवणूक करत असल्याबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला.राज्य सरकार आणि शिक्षण खात्याने अशा प्रकारच्या शाळांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. म्हणजे अन्य कुठल्या शाळा अशा प्रकारचे धाडस करणार नाही असे संतप्त झालेले विद्यार्थी, पालकांनी यावेळी बोलून दाखवले.
गुणपत्रिका देण्यास मुख्याध्यापकांचा विरोध, बदलापूरची घटना, विद्यार्थी, पालकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 1:25 AM