जव्हार : जिल्हा परिषद शाळा नियमित भरविण्यात यावी, शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, शालेय कामकाज पारदर्शक व्हावे, या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या सेल्फी हजेरीवर, स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकला आहे. या तालुक्यातील ८० टक्के जि. प. शाळा या डोंगरदऱ्यांत आहेत. अशा ठिकाणी सध्या कोणत्याही फोनची रेंज नसल्याने, साधे फोनदेखील लागत नाही.त्यामुळे येथील शिक्षक सेल्फी पाठवणार कसे? अशी अडचण आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सेल्फी हजेरीवर महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांवरती वेगवेगळ्या विषयांची परिपत्रके, आदेशांचा भडिमार होत असतो. त्या सर्व कामांसाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान नसून, महिन्याला हजारो रुपयांची पदरमोड करून, शासनाची परिपत्रके व आदेशानुसार शिक्षक काम करीत असतात. त्यात आता हे नवे काम मागे लावून घेण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे. शासनाचा सेल्फी हजेरीमागचा हेतू चांगला आहे, परंतु कनेक्टिव्हिटी नसेल, तर करणार काय? हा प्रश्न आहे. तालुक्यातील अनेक भागांत मोबाइल टॉवर नाही, अशा कठीण परिस्थितीत सेल्फीचे लाड पुरवायचे कसे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य स्वाभिमान शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सेल्फीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. (प्रतिनिधी)... मग सेल्फीची कशाला?उपस्थितीची नोंद करण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रिक्स बसवले जातील, पण मग सेल्फी काढून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे दाखले शिक्षकांनी का द्यावेत, असा सवाल मुंबई मुख्याध्यापक संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी वेळ द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. मंगळवारी मुख्याध्यापक संघटनेची कोल्हापूर येथे बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये यावर विटार होईल, असे संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
सेल्फी हजेरीला शिक्षकांचा विरोध
By admin | Published: January 09, 2017 4:49 AM