वसई : नायगावकरांना दोन महिन्यात नळाचे पाणी पुरवले जाणार असून तोपर्यंत टँकरव्दारे मोफत पाणी पुरवठा करील असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे मी नायगावकरांनी तूर्तास आमरण उपोषण स्थगित केले आहे. दीड लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नायगावला अद्याप नळाचे पाणी नाही. गेल्या दहा वर्षांपासून टँकरवर अवलंबून असलेल्या नायगावकरांनी प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी आमरण उपोषण सुुरु केले होते. त्यासंंबंधीचे सविस्तर वृत्त मंगळवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी माजी आमदार विवेक पंडित, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, प्रवीण गावडे, अमर गोगटे आणि संदीप म्हात्रे यांनी मंत्रालयात पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. यावेळी पंडीत यांनी नायगावकरांचा पाण्याचा प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मंत्री महाजन यांनी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्याशी संपर्क साधून मार्ग काढला. यावेळी लोखंडे यांनी दोन महिन्यात नायगावकरांसाठी नळ पाणी पुरवठा योजना सुरु केली जाईल. तसेच पाणी टंचाईच्या काळात महापालिका टँकरने पाणी पुरवठा करील असे आश्वासन दिले. याप्रकरणी आढावा घेण्यासाठी येत्या २५ एप्रिलला मंत्रालयात पुन्हा बैठक बोलावण्यात आली असून यावेळी मंत्री महाजन माहिती घेणार आहेत, अशी माहिती विजय पाटील यांनी दिली. मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर प्रवीण गवस आणि त्यांच्या सहकार्यांनी तूर्तास उपोषण स्थगित केले आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेकडून नायगावकरांना तूर्तास टॅँकरद्वारे दिलासा
By admin | Published: April 19, 2017 12:05 AM