ठाणे : कोलबाड ठाणे येथील गणराज हाईट्स या गृहनिर्माण संकुलात दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा प्रारंभ गो ग्रीन सेव इन्व्हायर्नमेंट हे ब्रीदवाक्य घेऊन सायकल वाटप करून करण्यात आला. लहान मुले तसेच तरुणांना मोटारींमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे धोके समजावून सांगतानाच पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालविण्यास प्रोत्साहन म्हणून सोसायटीच्या सभासदांतर्फे सायकल वाटप करण्यात आले.
अलीकडेच दक्षिण कोरियातील सेउल येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी परिषदेत जागतिक तापमानवाढीबद्दल धक्कादायक निष्कर्ष काढले गेले होते. जागतिक तापमानवाढ ही आता अपरिवर्तनीय झाली असून लागलीच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी न केल्यास मानवजातीसह सर्वच सजीवांना याचा प्रचंड मोठा धोका संभवतो तसेच तापमानवाढीचा सर्वाधिक फटका हा भारतीय उपखंडात बसणार असल्याचेही या निष्कर्षामध्ये नमूद केलेले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणेकरांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याकरिता 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे गणराज हाईट्स च्या पदाधिकाऱ्यांतर्फे सामाजिक हेतुने सायकल वाटप करण्यात आले. सायकल ही शुन्य टक्के कार्बन उत्सर्जित करते तसेच रस्त्यांवर कमी जागा व्यापते त्यामुळे ट्रॅफिक कोंडीतुन मुक्तता होऊन परिणामकारकरीत्या कोंडीत अडकून इंधन जळल्याने होणाऱ्या प्रदूषणातून सुद्धा मुक्तता मिळू शकते व आजकाल इलेक्ट्रिक सायकलिही उपलब्ध असल्याने त्या मोटारबार्ईकसाठीसुद्धा उत्तम पर्याय ठरू शकतात त्यामुळेच आम्ही सायकल वाटपाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थेचे पदाधिकारी सलील चव्हाण यांनी सांगितले. जगातल्या १५ अतिप्रदुषित शहरातील १२ भारतातील आहेत. या प्रदूषणात सर्वात मोठा वाटा खाजगी गाड्यांचा आहे. महानगरातील सार्वजनिक वाहतूक सेवांचा पार बोजवारा उडाला असल्याने नोकरी धंद्यानिमित्त गाडी वापरणे जरी अपरिहार्य असले तरी पर्यावरणाच्या रक्षणार्थ व आरोग्यासाठी अजिबात प्रदूषण न करणारी सायकल हा पर्याय आता स्वीकारणे गरजेचे आहे. सायकल चालविण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्याकरिता पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर नागरिक आनंदाने हा पर्याय स्वीकारतील असा विश्वास पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी व्यक्त केला. आज गणराज सोसायटीने याकामी महत्वाचे पाऊल उचलले असुन ठाण्यातल्या इतर गृहनिर्माण संस्थासमोर दिवाळीच्या निमित्ताने आदर्श ठेवला आहे