सुरेश लोखंडेठाणे : होळी लहान करून पर्यावरण वाचवावे, पुरण पोळी होळीत अर्पण न करता, दान करून गरिबांच्या मुखात घालावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कल्याण शाखेने परिसरात परिसरात ‘होळी करा लहान... पोळी करा दान’ हा उपक्रम राबवला. त्यास गृहिणींनी उत्तम प्रतिसाद देत सोमवारी एक हजार ५०० पुरणपोळ्या दान केल्या आहेत.
आपला परिसर, समाज व देश यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या सण, परंपरांमध्ये योग्य बदल घडविणे हे समाजाचे एक अभिमानास्पद वैशिष्ट्य आहे. त्यानुसार होळी साजरी करीत असतानाच त्यात टाकण्यात येणाऱ्या पुरणपोळ्या दान करा, असे सांगून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये ठिकठिकाणच्या होळी जवळ जाऊन पोळ्या दान करण्याचा उपक्रम गृहिणीच्या निदर्शनात आणून दिला. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. या दानातून मिळालेल्या पोळ्या गरिबांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. याशिवाय धुळवडीच्या दिवशी रासायनिक रंग व फुगे वापरणे टाळावे, अशी जनजागृती धुळवडीच्या दिवशीही केली. या उपक्रमाला विविध गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक होळी मंडळे आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कल्याण पूर्व, वालधुनी व कल्याण पश्चिम भागात कार्यकर्त्यांचे तीन पथकांनी पुरणपोळ्या गोळ्या केल्याचे अंनिसचे महाराष्टÑ प्रदेशचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम जोगदंड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, पुरणपोळ्यांचे संकलन व वाटप करण्यासाठी समितीचे अंनिसचे कार्यकर्ते गौतम जाधव, राजेश देवरुखकर, संतोष म्हात्रे, सुशील माळी, तानाजी सत्त्वधीर, भगवान लोंढे, वर्षा पवार कदम, दत्ता बोंबे, कल्पना बोंबे, अनिता सरदार, नितीन वानखेडे, रोहित डोळस, सुनील ब्राम्हणे आदींनी मेहनत घेतली.गरीब वस्तीत केले पोळ्यांचे वाटपजमा झालेल्या पोळ्यांचे कल्याण पूर्वेकडील कचरा वेचणाऱ्यांच्या वस्तीत, वालधुनी परिसरातील गरीब वस्तीत, कल्याण रेल्वेस्टेशन, बस डेपो परिसरात व बापगाव येथील ‘मैत्रकूल’ संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले. याशिवाय या पुरणपोळ्यांचा लाभ गाडी चुकल्यामुळे बसस्थानकातील प्रवासी, एसटी कर्मचारी यांनीही घेतला.