डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तीन रस्त्यांची दुरुस्ती एमआयडीसीने केल्याने ते रस्ते सुस्थितीत आले असले तरी उर्वरित अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांची जबाबदारी त्यांचीच असल्याचे केडीएमसीने म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांच्या जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे येथील खड्डेमय स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.केडीएमसी परिक्षेत्रात समावेश झालेल्या २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायतीच्या राजवटीतून महापालिकेत आलेल्या या विभागातील रहिवाशांचीही स्थिती ‘ना घरका ना घाटका’अशी झाली आहे. निवासी भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मागील पावसाळ्यात खडी आणि भुसा टाकून दोनदा खड्डे बुजविण्यात आले; मात्र पावसाच्या पाण्यात हा प्रयत्न वाहून गेला होता. पावसाळ्यानंतरही खड्डे कायम राहिल्याने खड्ड्यांतून वाहने गेल्यावर उडणाऱ्या धुळीचा त्रास येथील नागरिकांना होत आहे.दरम्यान, खड्डेमय रस्त्यांसह अन्य नागरी सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. यासंदर्भात मध्यंतरी निवासी भागातील महिलांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. तेव्हा केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने करण्याचे आश्वासन दिले होते.खोदकामच्या बदल्यात मिळालेल्या पैशातून केले तीन रस्तेकेडीएमसीत निवासी भागाचा समावेश झाल्याने तेथील रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे बोलले जात आहे; मात्र एमआयडीसीने पुढाकार घेत नुकतीच तीन रस्त्यांची दुरुस्ती केली. सर्विस रोड, मॉडेल कॉलेज परिसरातील भाजी गल्ली, मिलापनगर तलाव रोड यांचा समावेश आहे. एमआयडीसी परिसरात अन्य प्राधिकरणांनी केलेल्या खोदकामाच्या बदल्यात वसूल केलेल्या पैशातून ही कामे करण्यात आली आहेत. पण उर्वरित रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीचीच आहे, असे एमआयडीसीने म्हटले आहे. तर दुसरीकडे निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी एमआयडीसीचीच असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाही या दोघांच्या वादात खड्ड्याचा प्रश्न कायम राहण्याची चिन्हे आहेत.
रस्तेदुरुस्तीसाठी एकमेकांकडे बोट, केडीएमसी, एमआयडीसीने झटकली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 1:27 AM