भिवंडी : शहरातील स्वामी अय्यप्पा सेवा समितीचे विश्वस्त, धामणकर नाका मित्रमंडळाचे उपाध्यक्ष राजेश एम. शेट्टी यांनी आपला ५० वा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून अत्यंत साधेपणाने साजरा केला. कोरोनामध्ये मातापित्यांचे छत्र हरपलेल्या ५१ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची फी भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
शेट्टी यांनी स्वामी अय्यप्पा मंदिर सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात मंगळवारी (दि. २७) ही घाेषणा केली. याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आमदार महेश चौघुले, भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पद्मानगर परिसरातील १४ महिला बचतगटातील महिलांसह शहरातील पत्रकारांना ५०० छत्र्यांचे वितरण करण्यात आले; तर, तीन विधवा महिलांना शिवणयंत्रे वितरित केली. पद्मशाली इंग्लिश मीडियम स्कूल व ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची फी भरणार असल्याचे पत्र शेट्टी यांनी यावेळी शाळा व्यवस्थापनास दिले. राजेश शेट्टी यांना शुभेच्छा देण्यासाठी अखिल पद्मशाली समाजाचे अध्यक्ष नरसय्या वेमूल, धामणकर नाका मित्रमंडळाचे पदाधिकारी विजय गुज्जा, हसमुख पटेल, संजय शहा, निष्काम भैरी, भाजप उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष ॲड. प्रवीण मिश्रा यांसह अनेक हितचिंतक उपस्थित होते.