डोंबिवली : एका गरीब कुटुंबातील मुलीच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारून मनसेचे शहर संघटक व परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आपल्या सामाजिक कार्याची प्रचिती दिली आहे. पश्चिमेतील चिंचोड्याचा पाड्यातील बाबाजी म्हात्रे चाळीत राहणाऱ्या सविता ठाकरे यांची मुलगी मनीषा हिच्या लग्नाची आर्थिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.सविता यांचे पती शांताराम ठाकरे यांचे २०१० मध्ये कॅन्सरने निधन झाले. मात्र, सविता यांनी न खचता घरची धुणीभांडी करून मोठ्या हिंमतीने सहा मुलींचे पालनपोषण केले. परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी पाच मुलींची लग्ने मोठ्या निर्धाराने केली. या कालावधीत वेळोवेळी म्हात्रे यांनी आर्थिक हातभार लावल्याचे त्या सांगतात.मनीषा हिचे लग्न ठरून टिळा लावण्याची तारीख ८ एप्रिल २०१८ ठरली होती. पण पैसा उभा कसा करायचा, असा प्रश्न त्यांना पडला होता. नातेवाइकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी म्हात्रे यांच्याकडे व्यथा मांडली. म्हात्रे यांनी त्यांचे मित्र अॅड. प्रदीप बावस्कर यांनी ठाकरे यांच्या घरच्या वस्तुस्थितीचा आढावा घेत लग्नाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली. मनीषाचा साखरपुडा ठरल्याप्रमाणे ८ एप्रिलला मुरबाडच्या खानिवारे येथील प्रमोद चौधरी यांच्याशी म्हात्रे आणि बावस्कर यांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला.दरम्यान, म्हात्रे यांनी आजवर गरजूंना मदत करणे, दुर्घटनाग्रस्त इमारतीतील कुटुंबाला दत्तक घेणे, लहान बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेचा खर्च उचलणे, खेळाडूचे पालकत्व स्वीकारणे, वाहक-चालकांना परिवहनचे मानधन देणे, भावना पटेल हिच्या लग्नाचा खर्च उचलणे, नाम फाउंडेशनला देणगी देणे, अशी अनेक विधायक कार्य केली आहेत. त्यात आता या मुलीच्या विवाहाच्या जबाबदारीच्या कार्याची भर पडली.
गरीब मुलीच्या विवाहाची स्वीकारली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 3:37 AM