- पंकज पाटीलबदलापूर : आगरी समाजातील लग्न, हळद आणि वाढदिवस हे खर्र्चिक बाब झाली आहे. आगरी समाज आर्थिकदृष्ट्या समृध्द होत असताना खर्चांवर निर्बंध राहत नाही. मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची फॅशन समाजात रूढ झाली आहे. त्यामुळे बदलापूरमधील आगरी महोत्सवात बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील समाज बांधवांनी या खर्चावर निर्बंध घालण्याचा ठराव केला.सर्वात आधी समाजातील राजकीय नेत्यांनी हा वायफळ खर्च बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसांवर लाखोंचा खर्च न करता हा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या वाढदिवसाच्या खर्चापैकी काही रक्कम समजाच्या उन्नतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.ठाणे जिल्ह्यात अनेक महोत्सव भरविले जातात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधी अनेक महोत्सव भरवून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र बदलापूरमध्ये नुकत्याच झालेला आगरी महोत्सव हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता या महोत्सवात आगरी समाजातील वाढत चाललेला वाढदिवसाच्या प्रथा बंद करण्याचा ठराव करण्यात आला. बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील आगरी बांधवांनी या पुढे आपले वाढदिवस दिमाखात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्न आणि हळदी समारंभावर होणारा अवास्तव खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने वाचणारा पैसा सामाजिक कामासाठी वापरण्यावर एकमत झाले आहे.गेल्या काही वर्षात आगरी समाजातील लग्न, हळदी समारंभ आणि बड्या व्यक्तींचे वाढदिवस आणि त्यावर होणारे खर्च हे चर्चेत आले होते. आर्थिक सुबत्ता आल्यावर समाज बांधवांचे खर्चावर निर्बंध राहिलेले नाही. त्यामुळे वाढदिवस हे जंगी होत चालले होते. वाढदिवस साजरा करण्याची फॅशन प्रचलित झाली होती. या आधी लग्न आणि हळदी समारंभही चर्चेचे विषय होते. त्यात वाढदिवसांचीही भर पडली.नेत्यांचे वाढदिवसच नव्हे तर नेत्यांच्या आणि बड्या व्यक्तींच्या मुलांचे वाढदिवसही खर्ची होत होते. त्यामुळे समाजात चुकीची पध्दत प्रचलित झाली होती. या सर्वांवर निर्बंध घालणे शक्य होत नसल्याने आता आगरी महोत्सवात या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला. आगरी समाजातील चुकीच्या चालीरिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.हळदी समारंभातील राडा कमी करून हा खर्चही कमी करण्यावर एकमत झाले. हा निर्णय कुणावर लादण्यात आलेला नसला तरी या संदर्भातील निर्णय प्रत्येकाने स्वत: घ्यावे असे निश्चित करण्यात आले. समाजबांधव कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे. या समाजातील लग्नसोहळा म्हणजे थाटामाटात साजरा केला जातो. तसेच हळदीच्या कार्यक्रमावरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. पण प्रत्येकालाच हे परवडत नाही असेही काहींनी सांगितले.म्हात्रे वाढदिवस साजरा करणार नाहीतबदलापूरमधील काही नेत्यांच्या वाढदिवसाची चर्चा ही सर्वत्र असते. त्यात वामन म्हात्रे यांचा वाढदिवस हा सर्वाधिक चर्चेत राहणारा असतो. त्यामुळे म्हात्रे यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या वाढदिवसाचा वाचणारा खर्च हा आगरी समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजाने जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यात ती मदत दिली जाणार आहे.दारूवरील खर्च कमी करण्यावर एकमतआगरी समाजातील हळद समारंभात दारूचा अवास्तव वापर होतो. तो खर्चही कमी करण्यावर एकमत झाले आहे. हळदी समारंभात दारू टाळण्यावरही चर्चा झाली. या संदर्भातील निर्णय प्रत्येकानेच घेतला पाहिजे असा सूर उमटला. तसेच हा खर्च कमी करण्याबाबत प्रत्येकाने निर्णय घ्यावे असेही निश्चित करणयत आले.समाजात अनिष्ट चालीरिती वाढत आहेत. आर्थिक सुबत्ता वाढत असताना चुकीच्या प्रथा वाढत होत्या. त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागले. या पुढे सामाजिक उपक्रमात सर्वाधिक वावर वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.- शरद म्हात्रे, समाजबांधव
लग्न, वाढदिवस खर्चावर निर्बंध; आगरी महोत्सवात निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:26 AM