ठाणे : कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याचे लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी ठाणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील त्यांच्या नियंत्रणातील काही क्षेत्रामध्ये लागू असलेल्या संचार बंदीचे काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजपर्यंत सुरू ठेवता येतील. तर याच वेळेत अत्यावश्यक नसलेली इतर दुकाने मॉल्स, शॉपिंग सेंटर्स वगळता सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहतील. परंतु ही दुकाने शनिवार व रविवार या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.जिल्ह्यातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये २९ मेचा कोरोना चाचणी पॉझिटिव्हीटी दर १०टक्के पेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स ४० टक्के पेक्षा कमी प्रमाणात रुग्णांनी भरलेले आहेत. यास अनुसरू जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लागू असलेल्या संचार बंदीचे निर्बंध काही अंशी शिथील केले.यामध्ये दुकानांच्या वेळांसह जीवनावश्यक वस्तूं व इतर वस्तूंचे ई-कॉमर्स माध्यमातून म्हणजे आँनलाईन सेवा घेण्यास मान्यता दिली आहे. वैद्यासकीय व इतर तातडीचे कारणाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी दुपारी ३ वाजेनंतर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास सर्वांना मज्जाव केला आहे. शासनाच्या आधीच्या आदेशानुसार वस्तूंची घरपोच सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोविडशी निगडीत कामकाज करणार्या कार्यालयांन व्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीनिशी सुरू ठेवता येणार आहे. यापेक्षा अधिक उपस्थिती हवी असेल तर त्यांचे विनंतीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभाग प्रमुखास तशी परवानगी दिली जाणर आहे. कृषीक्षेत्राशी संबंधित सर्व कृषि सेवा केंद्र व त्याच्याशी निगडित असलेली उत्पादन व वाहतूक सेवा आठवड्यातील सर्व दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.
या नेमून दिलेल्या शासन आदेशानुसार काटेकोर अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर, निजामपूर, उल्हासनगर महापालिका, कुळगांव बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करण्याचे आदेश जारी केले आहेत. जारी केलेले आदेश १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहणार आहेत. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी पारीत केलेले आदेश त्या-त्या महापालिका क्षेत्रामध्ये लागू राहणार आहेत. लागू केलेल्या आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करण्यास सूचित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे.