ठाणे : ठाणे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना गुजरात विधानसभेच्या निकालानंतर उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस फारशी प्रभावी नसल्याने गुजराती, मारवाडी मतदार अजूनही भाजपासोबत असल्याचा विश्वास त्या पक्षाच्या आमदारांना वाटतो आहे. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या काही जागांवरील विद्यमान उमेदवार बदलावे लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवामुळे कपिल पाटील यांच्या खासदारकीला आव्हान उभे राहिल्याचे मानले जाते. भिवंडीची लोकसभेची जागा जर शिवसेनेने नव्या ताकदीने लढवली, तर पक्षाला धोका उद््भवू शकतो, असे नेत्यांचे म्हणणे आहे. कल्याणच्या श्रीकांत शिंदे यांच्या जागेसाठी शिवसेनेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे आणि ठाण्याच्या विजयातील कच्चे दुवे शोधून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाकडे ठाणे, कल्याणमध्ये लोकसभा लढवण्यासाठी पुरेशा ताकदीचे उमेदवार नाहीत. त्यामुळे यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन व्यक्तींभोवती त्यांनी आधीच गळ टाकला आहे. शिवसेनेच्या एका आमदारावर त्यांचे लक्ष आहे. त्याचवेळी पक्षाच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील तीन आमदारांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी ‘तयार करण्याचे’ काम सुरू आहे. आमदार तयार झाले, तर विधानसभेसाठी पक्षातील नव्या चेहºयांचा शोध घेतला जाऊ शकतो, हे गृहीत धरून अनेकांनी आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मनसेच्या कल्याण-डोंबिवलीतील काही नेत्यांशी भाजपाने जिव्हाळ््याचे संबंध राखले आहेत. गुजरातच्या निवडणूक निकालावर ही समीकरणे अवलंबून होती. तो निकाल लागल्याने आणि धक्का बसूनही सत्ता राखता आल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गुजराती मतांसोबतच अन्य अमराठी भाषक मतदारांना पक्षाशी जोडून घेण्याचे काम सध्या वेगवेगळ््या पातळीवर हाती घेण्यात आले आहे. शिवसेनेशी लढण्यासाठी मनसेला बळ दिले तर मराठी मतांची विभागणी होईल आणि अन्य भाषक मतदारांच्या आधारे विजय मिळवता येईल, अशी खेळी त्यामागे असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले.
गुजरात निकालाचा परिणाम : ठाणे जिल्ह्यात पुन्हा भाजपाचे मनोबल वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:02 AM