उल्हासनगर : अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मयत मूळ वारसांच्या वारसांऐवजी अनाेळखी व्यक्तीने बनावट कागदपत्रांद्वारे लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शनिवारी आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, आतापर्यंत तीन गुन्हे नाेंदवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. यात माेठे मासे अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगर प्रांत कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका नायब तहसीलदाराला रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.ऑक्टोबर २०२१ मध्ये मृत मूळ मालकाच्या वारसांबाबत उल्हासनगरचे प्रांताधिकारी जयराज कारभारी यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. तेव्हा बनावट कागदपत्रे सादर करून बनावट व्यक्ती भूसंपादनाचा मोबदला लाटत असल्याचे उघड झाले. कारभारी यांच्या आदेशाने अखेर ७ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. तसेच ३० लाखांचे वाटप थांबविण्यात आले. कारभारी यांनी यापूर्वीच्या वाटपाची चौकशी केली असता, दोन प्रकार उघड झाले आहेत. त्यानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ११ मे व २१ मे २०२२ रोजी गुन्हे दाखल झाले आहेत.
या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून, चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला अटक होणे गरजेचे असल्याचे मत कारभारी यांनी व्यक्त केले. प्रांत कार्यालयातून सेवानिवृत्त नायब तहसीलदाराला पुन्हा कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले हाेते. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर ताे प्रकृती अस्वास्थ्याच्या नावाखाली गैरहजर राहिला हाेता. या प्रकाराने खळबळ उडाली असून यातून मोठे सत्य बाहेर पडण्याची शक्यता आहे.
११ काेटींचे झाले वाटपउल्हासनगर प्रांत कार्यालयांतर्गत अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणासाठी २०१९ पासून भूसंपादनाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी १५७ कोटी १६ लाखांची तरतूद केली आहे. आजपर्यंत भूसंपादन केलेल्या जमीन वाटपाची एकूण किंमत १८ कोटी ७८ लाखांपैकी ११ कोटी ५१ लाखांचे वाटप झाले, तर सात कोटी २० लाख रुपयांचे वाटप शिल्लक आहे.